ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना दहा लाखांचा निधी : आमदार बबनराव पाचपुते

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.

सदर गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली भावना आहे. बिनविरोध निवडणुका करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील गावांना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी आपण देणार असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

या संदर्भात श्री. पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ” गेल्या ९ महिन्यापासून आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट आहे. याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. शिवाय निवडणूक म्हटलं की गावात गटतट निर्माण होतात.

या राजकारणाचा गावाच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होतो. वाद-विवाद टाळण्यासाठी, गावाच्या विकासासाठी, व आर्थिक संकटात शासनाचे पैसे वाचविण्यासाठी, गावांना विकासाची दिशा मिळावी म्हणून गावकऱ्यांनी एकजुटीने उभे राहावे व या निवडणुका बिनविरोध कराव्यात.

” बिनविरोध निवडणुका म्हणजे आदर्श गाव निर्माण करण्याची ही पायाभरणी ठरू शकते. पूर्ण गावाची एकी झाल्यास त्या गावाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व नगर तालुक्यातील २२ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

यातील जी गावे निवडणुका बिनविरोध करतील त्या गावांना प्रत्येकी दहा लाखांचा निधी आपण देणार आहोत. गाव-कारभाऱ्यांनी गटतट बाजूला ठेवत गावाला दिशा देण्यासाठी निवडणुका बिनविरोध करून वेगळा आदर्श निर्माण करावा अशी भावना पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.

चौकट :- कोरोनाग्रस्त असूनही ‘समाजकार्य’ सुरूच.. नुकताच बबनराव पाचपुते यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः वर कोरोनाचे उपचार सुरू असताना देखील पाचपुते यांचे तालुक्यावर लक्ष आहे. तालुक्यातील लोकांशी ते फोनवरून संपर्क ठेवत त्यांच्या अडीअडचणी सोडवत आहेत.

शिवाय काही दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत त्यांनी बिनविरोध निवडणूका या उपक्रमास सुरुवात केली. कोरोना सारख्या आजाराने वेढले असताना ही पाचपुतेंची ही सक्रियता चर्चेचा विषय ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment