तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया ! भाडेकराराचे टेंडर…

Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बी. बी. तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली. त्यासाठी पाच निविदा अर्जाची विक्री झाली असली तरी केवळ यवतमाळ जिल्ह्यातून डेक्कन शुगरकडून निविदा दाखल करण्यात आली आहे.

याबाबत बँकेकडून कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. एकच निविदा आल्याने रिकॉल टेंडर प्रक्रिया होण्याची चिन्ह आहेत.

जिल्हा बँकेने तनपुरे कारखान्याला कर्जपुरवठा केला होता. कर्ज वेळेत न भरल्याने बँकेने वर्षभरापूर्वी कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. सद्यस्थितीत कारखान्याकडे ९० कोटी ३ लाखांची मुद्दल व ३४ कोटी ७२ लाख व्याज असे एकूण १२४ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे.

जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १२ ऑक्टोबर पासून निविदा फॉर्म विक्रीला सुरुवात केली. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत होती. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून एक अहमदनगर जिल्ह्यातून एक व पुणे जिल्ह्यातून तीन जणांनी निविदा अर्ज नेले होते.

एका अर्जाची किंमत ३० हजार रुपये आहे. निविदा उघडण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळासमोर निविदा उघडण्यात येणार आहेत.आतापर्यंत केवळ यवतमाळ जिल्ह्यातून एक निविदा दाखल करण्यात आली आहे.

निविदा प्रक्रियेत अपेक्षीत स्पर्धा होण्यासाठी किमान तीन ते चार जणांच्या निविदा अपेक्षित आहेत. अशा स्थितीत बँक ही निविदा स्विकारणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बँक व्यवस्थापनाकडून कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीत करणार चर्चा

बोर्ड मिटिंगमध्ये खल पाच जणांनी निविदा अर्ज नेले होते, परंतु एकच निविदा दाखल झाली आहे. अर्ज नेतानाच ३० हजारांचे डिपोझिट भरले, पण निविदा दाखल का झाली नाही. याबाबत लवकरच बोर्ड मिटिंग लावून चर्चा करणार आहोत. एकच टेंडर असेल तर, त्याला देता येईल का ? याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ – शिवाजी कर्डीले, चेअरमन, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.