शेवगाव: तालुक्यातील भावी निमगाव येथील बाळासाहेब दत्तात्रय मरकड याला दगड मारून दात पाडल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा व शंभर रुपये दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावली.

२६ मे २०१४ रोजी रेवणनाथ दत्तात्रय मरकड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्याची पत्नी ट्रॅक्टर भाड्याने लावून शेतीची मशागत करत असताना बाळासाहेब मरकड याने अडथळा निर्माण करून रेवणनाथ यांच्या तोंडावर दगड मारून दात पाडला. सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, त्याची पत्नी, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी ग्राह्य धरण्यात आल्या.
सरकारी वकील महेंद्र अदवंत यांनी युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नेप्ते यांनी आरोपीस दोषी धरून सहा महिन्यांची शिक्षा, शंभर रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.