राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांसह भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्यांवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करण्याचा इशारा नुकताच दिला आहे.
यामुळे दूध भेसळीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील एका दूध भेसळखोरावर कारवाईचा बडगा उगारताच एका दिवसात एका तालुक्यातील दुधाचे प्रमाण ६० हजार लिटरने कमी आल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले

दुधात होणारी भेसळ अतिशय गंभीर – यापूर्वी अनेक ठिकाणी दूध भेसळ करणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याची उदहरणे आहेत. प्रामुख्याने कमी पावसाच्या व दुष्काळी जिल्ह्यांत पशुधनाचे प्रमाण कमी आहे, त्या जिल्ह्यांत असे प्रकार वाढत आहेत.
मागणीच्या तुलनेत दूध पुरवठा कमी होत असलेल्या भागातही असे प्रकार वाढत आहेत. दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ केलेले दूध टिकून राहण्यासाठी त्यामध्ये खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, युरिया हे पदार्थ मिसळतात.
पाणी घालून दुधाचे माप वाढवल्यामुळे त्यातील एसएनएफ (घनपदार्थविरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च तसेच मीठ, युरिया, स्कीम मिल्क (दुधाची पावडरची भेसळ करण्यात येते.
दुर्गम भागात दररोज संकलित होणारे दूध प्रत्येक दिवशी एकाच वेळेला संकलन केंद्रावर संकलित केले जाते. त्या ठिकाणीही दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपडे धुण्याची पावडर, युरिया इत्यादींसारखे पदार्थ मिसळतात.
भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम – भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते. त्यापासून असाध्य आजार उदभवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो.
युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते. तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसिन है अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही.
परिणामी लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडियमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजारही जडतात.