अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- वेल्डींग-फॅब्रिकेशन तसेच लेदर कटिंग व तत्सम फॅब्रिकेशनची कामे करणाऱ्या ३०० वर कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या कंपन्यांना त्यांच्या फॅब्रिकेशन-वेल्डींग कामासाठी ऑक्सिजनची गरज आहे.
पण कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन देण्याच्या प्रशासनाच्या धोरणाने इंडस्ट्रीचा ऑक्सिजन पुरवठा जवळपास बंदच झाला आहे. पुण्या-मुंबईतून लिक्विड ऑक्सिजन आणून तो सिलेंडरमध्ये भरून पुरवठा करणाऱ्या नगरमधील ७-८ सप्लायर्सकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तळ ठोकून असून,
ऑक्सिजन सिलेंडर औद्योगिक वापरासाठी जाऊ दिले जात नाही. त्यामुळे हजारो-लाखो रुपयांची इंडस्ट्रीयल प्रॉडक्टस निर्मिती बंद झाली असून, कामगार मंडळी काम नसल्याने बसून आहेत. काम नसल्याने सुमारे १० हजारावर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्योजकांच्या आमी संघटनेने औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा काहीअंशी तरी होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा प्राधान्याने दिला जावा, पण थोडा तरी इंडस्ट्रीला दिला तरी इंडस्ट्रीचेही काम ठप्प होणार नाही, असे म्हणणे आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी व्यक्त केले.
ऑक्सिजनचा आतापर्यंतचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी २० टक्के व औद्योगिक क्षेत्रासाठी ८० टक्के होता. पण कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनची गरज वाढल्याने आता वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्के पुरवठा सूत्र निश्चित केले गेले आहे.
पण नगरच्या स्तरावर हे सूत्रही रद्द करून १०० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरवठा धोरण राबवले जात असल्याने औद्योगिक क्षेत्राला विविध उत्पादनांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी कारखाने बंद पडले आहेत. औद्योगिक उत्पादनेही कमी होऊ लागली आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved