जट निर्मूलनाने महिलेच्या अंधश्रद्धेला मूठमाती

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील महिलेच्या अंधश्रध्देला कार्याध्यक्षा नंदीनी जाधव यांनी जट निर्मूलनाने मूठमाती दिली .यासाठी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रात आजही ग्रामीण भागात अनेक रूढी परंपरा अस्तित्वात आहेत .

अनेक महिला अंधश्रद्धेपोटी केसातील जट वाढवून नकळत अंधश्रध्देला खतपाणी घालतात . देवदैठण येथे धुणीभांडी काम करणाऱ्या ललिता सुभाष ओहोळ यांच्या केसात गेल्या दहा वर्षापासून जट होती .जट काढण्यासाठी एक तोळा द्यावा लागेल अशी मागणी या मजुरी करणाऱ्या कुटूंबाकडे केली गेली होती .पंचायत समिती सदस्या कल्याणी अतुल लोखंडे यांनी त्यांचे प्रबोधन केले व जट का होते ? ती आरोग्यासाठी घातक आहे हे पटवून दिले .

ललिता व पती सुभाष या दोघांनी यासाठी सहमती दर्शवली . त्यानंतर लोखंडे यांनी अ‍ॅड . कमल सावंत यांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क केला .नंदिनी जाधव यांनी पुण्यावरून येऊन विनामूल्य ललिता ओहोळ यांची जट काढली .

आतापर्यंत नंदिनी जाधव यांनी महाराष्ट्रातील १५७ महिलांच्या जटा उतरवल्या आहेत व अंधश्रद्धा निर्मूलनाचे तीन हजार कार्यक्रम घेतले आहेत . गेली दहा वर्षापासून होणाऱ्या त्रासापासून ओहोळ यांची यामुळे सुटका झाली आहे .यावेळी कल्याणी लोखंडे यांनी ललिता ओहोळ यांना साडी चोळी भेट देऊन सन्मान केला .

अ‍ॅड . कमल सावंत यांचे सहकार्य मोलाचे ठरले . अंधश्रद्धेमुळे भितीपोटी अनेक बळी गेले आहेत . महिलांनी डोक्याच्या जटा वाढवल्यास देवाची कृपा होईल या अंधश्रद्धेपोटी वाढवलेल्या जटा ही देवावरची श्रद्धा नसून निव्वळ अंधश्रद्धा आहे . प्रबोधनातून त्यांच्या जटा उतरवल्यामुळे आत्मीक समाधान मिळाले. कल्याणी लोखंडे पंचायत समिती सदस्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment