व्यापाऱ्यास लुटणाऱ्या चौघांस पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील निवारा येथील व्यापार्‍यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लुटणार्‍या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच जेरबंद केले आहेत.

सोमनाथ रघुनाथ गोपाळ, गणेश जालिंदर चव्हाण, राहुल प्रभाकर गोडगे व रवींद्र अर्जुन तुपे अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 86 हजार 500 रुपये हस्तगत केले आहेत.

दरम्यान याबाबत घडलेली घटना अशी कि, गौड हे वाईन्स दुकानातून रोख रक्कम घेऊन घरी जाताना काही जणांनी गौड यांना अडविले.

धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लुटले होते. याबाबत दिलीप शंकर गौड (वय 35, रा.निवारा, ता.कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके हे तपास करत असताना हा गुन्हा सोमनाथ गोपाळ (रा. वाघवस्ती, शिर्डी) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

कटके यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शिर्डी येथून सोमनाथ गोपाळ यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गणेश चव्हाण, राहुल गोडगे, रवींद्र तुपे, सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांची नावे सांगितली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांचा शोध सुरू आहे. चोरीस गेलेल्या रकमेपैकी 86 हजार 500 रुपये पोलिसांनी हस्तगत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment