अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृष्टीने तर बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला आहे.
या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी आलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर माजी मंत्र्यांनी चांगलीच टीका केली आहे. ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केलेला पालकमंत्र्यांचा दौरा हा केवळ दाखवण्यासाठी व त्यांच्या श्रेष्ठींना माहिती होण्यासाठी असतो,
तो कामासाठी नसतो,’ असा घणाघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला आहे. ‘शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने जी दहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे, ती फसवी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणीही पाचपुते यांनी यावेळी केली. पाचपुते हे आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पाचपुते यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड हे देखील उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved