अहिल्यानगर : शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. कारण सध्या ४२ अंशापेक्षा अधिक तापमान होत चालले आहे. या उन्हाच्या परिणाम मनुष्याप्रमाणेच जनावरांनाही पडत असतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. जनावरांमध्ये आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. उन्हामुळे मानवी शरीराची लाहीलाही होते, त्याचप्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास होतो. ओल्या चाऱ्यावर भर द्यावा, म्हशीमध्ये उष्णतेस असणाऱ्या कमी प्रतिकारशक्तीमुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
वाढत्या तापमानामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चारा खातात आणि संध्याकाळी जादा चारा खाण्याकडे त्यांचा कल असतो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चाऱ्यासोबत मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिपडल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात. अतिउष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना थंड पाणी पाजावे.

उन्हाळ्यात जनावरांना सकाळी व संध्याकाळी चारा खाण्यासाठी सोडावे. हवामान पूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्यांची उंची जास्त असावी. गोठ्यात हवा खेळती ठेवावी, परिसर थंड राहण्यासाठी आजूबाजूस झाडे लावावीत.
गोठा परिसर स्वच्छ ठेवा उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनवून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा मलमुत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने विविध प्रकारच्या आजारांचा प्रसार होत नाही. जनावरे सकाळी व सायंकाळी जनावरे चरण्यासाठी सोडावीत.तसेच दिवसभर जनावरांचे समोर पाणी राहील अशी व्यवस्था करावी. वेळप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा. पशु तज्ञाकडूनच वेळीच जनावरांना लाळ, खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगांची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत.