Ahilyanagar News : राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मानवहानी व पशुधन हानीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्याची मागणी पूर्वीच केलेली आहे.
सद्यस्थितीत राहुरी तालुक्यात २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर आहे. एका मादी बिबट्याला दरवर्षी किमान तीन पिलांना जन्म देत असल्याने बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे मानवी जीवित आणि पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. मागील सहा महिन्यांत मानवी मृत्यूंच्या घटनाही घडल्या आहेत, ज्यामुळे वनविभागाला नुकसानभरपाई म्हणून लाखो रुपयांची मदत देणे भाग पडले आहे

बिबट प्रवण क्षेत्र निश्चित करून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, बिबट्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या संख्येत नियंत्रण आणणे व त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी तनपुरे यांनी केली होती
नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खासदार निलेश लंके यांच्या निदर्शनास आणून दिले की, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ३५०हून अधिक पशुधनाचे नुकसान झाले आहे, तर अनेक लहान मुले, पुरुष जखमी झाले असून काहींना प्राणही गमवावे लागले आहेत
खासदार लंके यांनी वनाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पुरवल्याचा उल्लेख करत, हा विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे आणि केंद्रीय मंत्र्यांकडे व लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे. बिबट्यांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, निधी मंजूर करणे, निर्बीजीकरण व स्थलांतर करण्यासाठी शासनाकडून तातडीने निर्णय अपेक्षित आहे.