Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये आता उमेदवारांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जितक्या जास्त प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचता येईल तितका प्रयत्न केला जात आहे.
या दृष्टिकोनातून जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघ बघितला तर या ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांच्या आव्हान आहे. परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो व त्या दृष्टिकोनातून त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जात आहे.
परंतु प्रचाराच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये देखील त्यांनी वेग घेतला असून गावोगावी जाऊन मतदारांशी गाठीभेटी घेण्यावर त्यांनी सध्या भर दिल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून लोणी बुद्रुक या ठिकाणी त्यांनी बैठक घेतली व त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
लोणीत विरोधकांवर विखे पाटील यांनी साधला निशाणा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक येथे प्रचाराच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन केले होते व यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना धरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की विरोधकांकडे समाजासाठी काय केले हे सांगण्यासारखे सध्या काहीही शिल्लक नसल्याने ते फक्त बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
परंतु मतदार आता सुज्ञ झाले असून त्यांना यामध्ये यश येणार नाही. तसेच विरोधक बिनबुडेचे आरोप करीत असून कार्यकर्त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर द्यावे असे आवाहन या बैठकीत बोलताना माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी केले.
लोणी बुद्रुक येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी तसेच प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे तसेच सरपंच कल्पना मैड, एम वाय विखे इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हणाले मंत्री विखे पाटील?
यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासावर विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे यांचा सध्या भर फक्त खोटं बोलण्यावर दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाचा कालावधीमध्ये त्यांनी केलेले एक तरी काम सांगावे असे आवाहन देखील विखे पाटील यांनी विरोधकांना दिले.
परंतु महायुतीच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किती काम झाले हे आम्ही रोज सांगत आहोत व त्या कामावर मतदारसंघातील मतदार हे समाधानी आहेत असे देखील त्यांनी म्हटले.
बाहेरच्या लोकांच्या कुबड्या घेऊन निवडणुकीच्या वेळी लोकांसमोर येणारे विरोधक इतर वेळी कुठे जातात? असा प्रश्न देखील त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला. खोटे बोला परंतु रेटून बोला या पद्धतीने बुद्धिभेद करण्याचे काम सध्या विरोधक करीत आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.