ढोलताशांचा निनादात पोलिसांनी हद्दपार असलेल्या आरोपीला केले जेरबंद ; काय आहे नेमकं प्रकरण…

Ahmednagar News : एकीकडे ढोलताशांचा निनाद सुरु गुलालाची उधळण तर फटक्यांची आतषबाजी अशा जल्लोषपूर्ण वातारणात नेवासा पोलिसांनी अचानक इंट्री करत रेकॉर्डवरील सराईत हद्दपार आरोपी जुनेद शेख (रा. देवगाव, तालुका नेवासा) यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच या शाही सत्काराचे आयोजन करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जुनेद शेख यास अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

नेवासा पोलिसांनी त्यास त्याच्या नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगर येथे सोडले होते. शेख मागील काही दिवसांपासून देवगाव परिसरात लपून छपून राहात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. पोलीस त्याच्या हालचालींवर वॉच ठेवून होते.

यातच रविवार दि८ सप्टेंबर रोजी त्याच्या निवडीच्या प्रित्यर्थ देवगावमध्ये सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास तो उपस्थित राहाणार असल्याची पक्की खबर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळाली होती.

देवगावमध्ये सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने नेवासा पोलिसांचे एक पथक साध्या वेशात देवगावमध्ये धडकले.

एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारीपदी निवड झाल्यामुळे जुनेद मूळ गाव असलेल्या देवगावात (ता. नेवासा) सत्काराचे आयोजन रविवारी करण्यात आलेले होत. हद्दपार युवक गावात येताच ढोल ताशांचा निनाद सुरु झाला मात्र याच वेळी पोलिसांचे सध्या वेशात पथक या ठिकाणी दाखल झाले.

पोलिसांचे पथक पाहून जुनेद शेख याने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यास शिताफीने जागेवरच पकडून नेवासा येथे आणून त्याच्यावर हद्दपार आदेशाचे धुडकवणे या अपराधाखालीगुन्हा दाखल केला.

तसेच त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे शाहिद इनामदार, सोहेल शेख, सोनू शेख, बॅनर बनवणारा संदीप कोलते, ढोल-ताशा वाजवणारे सिताराम डाके, दादासाहेब उत्तम वाल्लेकर, सौरभ डाके व फटाके फोडणारे या आरोपींवरदेखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.