अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.
पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे.
बुधवार व गुरुवारी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढली असून.
भंडारदरा धरणात गुरुवारी सायंकाळी पाणीसाठा ८५८७ दशलक्ष घनफूट (७७.७९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणातील पाणीसाठा ५१२८ दलघफू (६१.५७ टक्के) झाला असून बारा तासांत नवीन पाण्याची आवक ११४ दलघफू झाली.
भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील गुरुवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतील घाटघर येथे १६५ (एकूण ३१२८ मिलीमीटर),
रतनवाडी १५५ (२३६०), पांजरे १४५ (२०१४), वाकी ९० (१२५७), भंडारदरा १४० (१७२२), निळवंडे २९ (७०४), मुळा धरण २ (६६१), आढळा ३ (१९५), कोतूळ ६ (३९६), अकोले १५ (७१८) मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
राहुरीतील मुळा धरणात ५९ टक्के व आढळा धरणात ५४२ दलघफू ५१.१३ टक्के झाला. कोतूळजवळून मुळा नदीचा प्रवाह १४३२१ क्युसेक्स वेगाने मुळा धरणात पाण्याची आवक सुरू आहे.
भंडारदरा परिसरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे. दरम्यान काल सायंकाळनंतर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.
१५ ऑगस्ट म्हणजे भंडारदरा परिसरात येणाऱ्यांची मांदियाळी असते. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे याठिकाणी वातावरण पर्यटकांविना सुने सुने आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved