Ahmednagar News : मृतमहिलेच्या शरीराचे अवशेष आढळले ! परिसरात एकच खळबळ

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पाथर्डी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या पाठीमागे एका शेतकऱ्याच्या तुरीच्या पिकामध्ये एका मृत महिलेच्या शरीराचे अवशेष आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, तिसगाव येथील पाथर्डी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या पाठीमागे शेतकऱ्याच्या तुरीच्या पिकामध्ये एका मृत महिलेच्या सांगाड्याची कवटी व शरीराच्या हाडांसह बांगड्या व साडी तिसगाव येथील एका व्यक्तीच्या निदर्शनास आली.

त्याने याबाबत तत्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी मृत सांगाड्याचे कवटीसह साड़ी, बांगड्या व डोक्याचे केस दिसून आल्यानंतर शरीराचे हे अवशेष एखाद्या महिलेचे असावेत,

या निष्कर्षापर्यंत पोलिस अधिकारी पोहोचले आहेत. या मृत सांगाड्यासह घटनास्थळाची सखोल पाहाणी करत असताना पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बिबट्याचे एक-दोन ठिकाणी ठसे दिसून आले,

त्यामुळे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांने महिलेवर हल्ला केला की, हा घातपाता प्रकार आहे, याबाबतचा तपास पोलिसांकडून होणार आहे. तिसगाव येथे मृत व्यक्तीची कवटी आढळल्याची माहिती वाऱ्यासारखी तिसगावसह परिसरात समजताच या ठिकाणी दिवसभर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.