कोण काय म्हणतं, कोण काय करतं, यासह इतर गोष्टींचा विचार करु नका, आपल्यासाठी काम करणारे कोण, पाठीशी राहणारे कोण, याचा विचार करा, पाच वर्षात आपल्यासाठी कोणी काय केले याचा विचार करा. ही निवडणूक सोशल मीडियावर नाही, तर सामान्य जनते पर्यंत जाऊन प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढायची आहे.
आपण केलेली विकास कामे, राबवलेल्या योजनांची माहिती जनतेला सांगायची आहेत. पक्षाने मला समन्वयक म्हणून केज व शेवगाव मतदार संघाची जबाबदारी दिली, याचा मला प्रचंड आनंद झाला.
दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची, हा माझा स्वभाव आहे. तुमचा सर्वांच्या मनातील उत्सव, आनंद हा मोनिका राजळे यांच्या विजयाची नांदी ठरेल असे प्रतिपादन डॉ प्रीतम मुंढे यांनी केले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी अभय आव्हाड मृत्युंजय गरजे भगवान बांगर दिनेश लाव्हाट अमोल गरजे अशोक चोरमले धनंजय वडे नंदकुमार शेळके भगवान आव्हाड बाजीराव लेंडाळ रामदास शिंदे सुरेश भागवत बाबा राजगुरू संजय शिरसाठ रवी आरोळे मुकुंद गरजे
नितीन देवाळकर एडवोकेट प्रतीक खेडकर सुभाष बर्डे बापूसाहेब पाटेकर अशोक ससाने अनिल वडागळे जलील राजे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोनिका राजळे ह्या माझ्या बहिणी सारख्या आहेत, असे भाषणाच्या सुरवातीला सांगत, प्रीतम मुंढे पुढे बोलताना म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी सोशल मीडियावर पिल्लू सोडते, मग त्या भोवती निवडणूक फिरते.
सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा. कोण काय बोलते, काय करते यापेक्षा सरकारच्या योजना नागरिकांना सांगा. माझी संघर्षाची वेळ आहे, पण माझी तक्रार नाही. कोणत्याही संविधानिक पदापेक्षा गोपीनाथ मुंडेंची लेक हे पद माझ्यासाठी मोठे आहे.
पंकजा मुंढे यांनी ग्रामविकास मंत्रालय काय असते हे २५१५ सारख्या विविध योजनांमधून दाखवून दिले. लोकसभेला झालेली चूक दुरुस्त करतांना पुढच्या आठ दिवसात विकासाचा मुद्दा घेऊन जनते समोर जाणार असल्याचे मुंढे म्हणाल्या.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या
पंकजा ताईंनी परळी पेक्षा जास्त लक्ष आपल्या मतदार संघावर दिले. पक्षाचा कार्यकर्ता जरी त्यांच्याकडे काम घेऊन गेला तरी त्याला त्यांनी भरभरुन दिले. लोकसभेत जी चूक झाली ती विधानसभेत दुरुस्त करायची आहे.
गावागावात लोक गुण्यागोविंदाने राहतात, मात्र विरोधक जातीपातीचे राजकारण आणतात त्यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडतो. लोकसभेतील अपयश भरुन काढण्याची संधी आली असल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.