अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात काही दिवस पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
यामुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढे, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहे. यातच मुसळधार पावसाचा काहीसा फटका राहुरी तालुक्याला बसला आहे.
राहुरी तालुक्यात परतीच्या पावसाने धुव्वाधार बॅटींग केली. तालुक्यात सर्वत्र झालेल्या पावसाने शेतकर्यांसह नागरिकांची दाणादाण उडवून दिली. रात्रभर चाललेल्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तर अनेक ठिकाणी नद्यानाल्यांसह ओढ्यांनाही पूर आला आहे. अनेक ठिकाणी बंधारेच वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मुळा नदीपात्रातून सुमारे 8 हजार क्युसेस इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. रेकॉर्डब्रेक पावसामुळे मुळा धरण याचवर्षी चौथ्यांदा भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळते आहे.
सध्या तालुक्यात कपाशी आणि सोयाबीन ही पिके काढणीला आली होती. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीसह पिकेच वाहून गेली असून कपाशी व सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम