अहमदनगर जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती ! २८ लाखांची रोकड सापडली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड यांना विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली असून,

त्यांच्या पुणे येथील सिंहगड रोडवरील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (अॅन्टी करप्शन) पथकाने मंगळवारी (दि.३०) झाडाझडती केली.

या झडतीत गायकवाड यांच्या घरी २८ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम अॅन्टी करप्शन विभागाला आढळून आली. ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. तब्बल २ ते ३ तासाहून अधिक वेळ घराची झडती करण्यात आली, अशी माहिती अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिली. आणखी काही घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रवरानगर येथील राधाकृष्णण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या व्यवस्थापकाकडून श्रीरामपूर कार्यालयातील वजन मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेमार्फत प्रवरानगर येथे पेट्रोल पंप चालविला जात आहे.

त्या पेट्रोल पंपाचे स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाड याने सुरुवातीला १२ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे मान्य झाले होते. ही कारवाई सोमवारी (दि.२९) लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली होती. या प्रकरणी लोणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

लाचखोर आरोपी अशोक गायकवाड याला कोपरगावच्या न्यायालयात मंगळवारी (दि.३०) हजर करण्यात आले. न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी दिली, १ फेब्रुवारीपर्यंत आरोपीला आता जेलची हवा खावी लागणार आहे.

दरम्यान, वजन मापे निरीक्षक अशोक गायकवाड याच्याकडे आणखी काही अवैध संपत्ती आहे का? याची बारकाईने तपासणी अॅन्टी करप्शन विभागाकडून चालू आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, रवि निमसे, सचिन सुद्रिक, किशोर लाड, हारुण शेख यांच्या पथकाने आरोपीस १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe