भामट्या महिलेने प्रवाशी महिलेला चालू बसमध्ये लाखोंना लुटले

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोर, लुटमारी, हातचलाखी करत लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यातच प्रवास करताना, बस स्थानक परिसरात आदी घटना हल्ली वाढू लागल्या आहेत.

नुकतेच कर्जत तालुक्यात प्रवाश्याना लुटणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महिला चोरट्याने एका प्रवाशी महिलेला प्रवासा दरम्यान लाखोंना फसवले आहे.

कल्याण औरंगाबाद बसने प्रवास करत असताना एका प्रवाशी महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित घटना घोडेगाव ते नेवासाफाटा या दरम्यान घडली आहे.

या प्रकरणी सिंधूबाई लक्ष्मण खाजेकर (वय 65) रा. लासूर नाका, गंगापूर जि. औरंगाबाद या महिलेने फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी 3 जानेवारी रोजी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मी व माझा नातू विराज असे कल्याण ते औरंगाबाद एसटी बसने (एमएच 14 बीटी 3031) गंगापूर येथे येण्यासाठी निघालो.

दुपारी साडेबारा च्या दरम्यान घोडेगाव येथून सदर बसमध्ये चार स्त्रिया व त्यांचे लहान मुल असे माझ्या शेजारी येवून उभ्या राहिल्या. त्यापैकी एक माझ्या शेजारी येवून बसली.

तिच्याजवळ लहान दोन ते तीन महिन्याचे बाळ होते. त्यापैकी एक महिला माझ्या बॅगजवळ खाली बसली. सदर स्त्रिया नेवासाफाटा येथे आल्यानंतर बसमधून उतरुन गेल्या.

त्यानंतर मी औरंगाबाद हायवे रोडवर गंगापूर फाटा येथे माझी बॅग घेवून नातू विराज याचेसह उतरले. तेथून मी रिक्षाने माझ्या घरी गंगापूर येथे गेले. घरी गेल्यावर बॅगेतील सामान बाहेर काढत असताना बॅगेच्या आतमधील बाजूस ब्लेड मारल्यासारखे फाटलेले दिसले.

मी बॅगेत ठेवलेल्या प्लॅस्टीक डब्याच शोध घेतला असता तो मिळाला नाही. तसेच 20 हजार रुपये ठेवलेली प्लॅस्टीकची पिशवी मिळून आली नाही. तसेच बॅगेत तब्बल 5 तोळे सोन्याचे दागिने होते.

हे दागिने तसेच प्लॅस्टीक पिशवीतील 20 हजार रुपये हे सर्व चोरीस गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ कुंडारे करत आहेत.