अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- सन २०१८ मध्ये पाठपुरावा सुरू झालेल्या बेल्हे ते राळेगणथेरपाळ या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी कोणताही पाठपुरावा केलेला नसताना केवळ ठेकेदाराकडून टक्केवारी मिळविण्यासाठी सुजित झावरे यांनी पत्रकार परिषदेचा फार्स केल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व नीलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार यांनी सोमवारी पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
परवा जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राळेगणथेरपाळ येथे पत्रकार परिषद घेउन बेल्हे ते राळेगणथेरपाळ या रस्त्यासाठी आपण खासदार सुजय विखे यांच्यामार्फत केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरवा केल्याचा दावा केला होता. या रस्त्यासाठी १६ कोटी निधी मंंजुर होउन खा. विखे यांच्या हस्ते या कामाचे भुमिपुजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
झावरे यांच्या या दाव्यावर तरटे व पवार यांनी आक्षेप घेत ज्या कामाशी काहीही सबंध नाही असे काम मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केल्याचा देखावा करून ठेकेदाराकडून टक्केवारी उकळण्यासाठी पत्रकार परिषदेचे खटाटोप करण्यात आल्याची टीका करण्यात आली. या कामासंदर्भात सबंधितांनी केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे सादर करण्यात येउन झावरे यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी खासदार दिलीप गांधी, पुणे जिल्हयाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार नीलेश लंके, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडूरंग पवार यांनी या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर व्हावे, रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुर करण्यात यावा यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यहार करून पाठपुरावा केला होता.
याच मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नितीन गडकरी यांच्याशी फोनवर संवाद साधून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. हजारे यांच्या मागणीनंतर गडकरी यांनी रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून त्याच्या कामासाठी निधीही मंजुर केला. रस्ताचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर, त्याच्या कामासाठी निधीची तरतूद या प्रक्रियेसाठी दिलेल्या योगदानाचा कोठेही उल्लेख न करता आमूक ठेकेदाराने तिस टक्के बिलो टेंडर भरून काम घेतल्याचे,
तसेच त्याचे भुमिपुजन खासदार सुजय विखे हे करणार असल्याचे झावरे यांनी सांगितले. या कामासाठी आपण पाठपुरावा केल्याचे सांगत झावरे यांनी मोठा विनोद केल्याचा टोला पवार व तरटे यांनी लगावला. केवळ ठेकेदारावर दबाव आणून टक्केवारी उकळण्यासाठी हे उदयोग सुरू आहेत. झावरे यांची टक्केवारीची ही दुकाणदारी आता बंद झाली असून याच टक्केवारीच्या लालसेपायी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. स्वतःवर विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला तरटे व पवार यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved