तरुण म्हणतो मुलगी पहायला गेलो आणि वेगळच घडलं.

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  पैशाच्या मोहांपैकी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही. नगर जिल्ह्यात पूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूटमार करण्याऱ्या टोळ्यांचा काही तालुक्यांमध्ये बोलबाला झाला होता.

तसेच अनेक फसवूणुकीचे प्रकार घडले होते. आता लग्नाच्या आमिषाने मुलगी दाखवण्याचा बनाव करून फसवणूक करण्याचे प्रकार नेवासा तालुक्यात वाढले आहेत. असे फसवूणुकीचे प्रकार नगर जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक आणि मराठवाड्यातही झाले आहेत.

असा फसवूणुकीचा प्रकार जालना जिल्ह्यातील एका विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या चाणाक्ष युवकाच्या वेळीच लक्षात आल्याने अशीच एक टोळी पकडली गेली. पोलिसांनी टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी कोणी लवकर समोर येत नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची अशी वेळ काही तरुणावर येत आहे.

फसवणुकीचे विविध फंडे

विवाह रखडलेल्या मुलांना तुझे लग्न लावून देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्या टोळ्या सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मुलगी दाखवण्याचा बनाव करायचा, पैसे घेऊन नंतर पळून जाणे. तर कधी लग्नही लावून द्यायचे मात्र,

लग्नानंतर मुलीने लगेच पळून यायचे, तर कधी मुलीला फिरायला घेऊन जा असे सांगायचे आणि नंतर पैसे दे नाही तर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल अशी धमकी तरुणाला द्यायची. अशा पद्धतीने या टोळ्या गुन्हे करत आहेत.

पहा फसवणुकीची प्रक्रिया

जालना जिल्ह्यातील एका युवकाच्या बाबतीतही असाच प्रकार घडत होता. मात्र, वेळीच लक्षात आल्याने पैसे देण्यापूर्वीच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस आले आणि टोळी पकडली गेली. हा युवक मोलमजुरीने काम करतो. त्याचे लग्न करायचे असल्याने त्याची बहीण त्याच्यासाठी मुलगी शोधत होती.

तिच्या गावातील परिचित ओमकार भानुदास कासार याला तिने मुलगी पाहण्यास सांगितले होते. कासार याने नेवासा येथील एक स्थळ आणले. त्यासाठी नेवासा येथे जावे लागेल आणि मुलीच्या नातेवाईकांना १ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं.

त्यानुसार पवार नातेवाईकांसह आणि ओमकार भानुदास कासार व त्याचा मित्र रावसाहेब नारायण वानखेडे यांच्यासह नेवाशात आले. तेथे गेल्यावर बसस्थानकासमोर गाडी थांबवून कासार पैशाची मागणी करून लागला. आधी पैसे द्या, मग मुलगी दाखवू असं सांगितलं.

त्यावर पवार याने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे मिळाले नाहीत. गावी परत गेल्यावर पैसे देतो असे त्याने सांगितले. त्यानंतर कासार याने कोणाला तरी फोन केला.

थोड्या वेळात तेथे दोन महिला व एक मुलगी आली. त्यांनी प्रथम मुलीचे नाव कोमल राजू साठे, तिची मावशी संगिता वसंत जाधव रा. पैठण जि. औरंगाबाद व दुसरी महिला सुमन रमेश वाघमारे रा. हडपसर (पुणे) अशी ओळख करून दिली. त्यानंतर लगेच पैसे द्या, अशी मागणी करू लागले.

मुलीला आई-वडील नाहीत. तिची मावशी लग्न करून देणार आहे, त्यासाठी पैसे हवेत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून पवार यांना संशय आला.

हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी महिलांनी अचानक भूमिका बदलली.

पैसे दिले नाहीत तर आमच्यासोबत आणखी मुली आणल्या आहेत. त्या तुमच्याविरूद्ध अत्याचाराची फिर्याद देतील, अशी धमकी दिली. त्यामुळे पवार यांनी बाजूला जाऊन पोलिसांना फोन केला. पोलीसही तातडीने तेथे आले आणि सर्वांनाच पोलीस ठाण्यातघेऊन गेले.

तेथे विजय देविदास पवार यांच्या फिर्यादीवरून ओमकार भानुदास कासार, रावसाहेब नारायण वानखडे (दोघे रा. तिर्थपुरी ता. घनसांगवी जि. जालना), कोमल राजू साठे, संगिता वसंत जाधव (रा. पैठण, जि. औरगाबाद) व सुमन रमेश वाघमारे (रा. हडपसर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe