Ahmednagar News : नगर शहराजवळील विळद घाटातील विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसह इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी कागदपत्रे अस्ताव्यस्त करून नुकसान केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ६ ते शनिवारी (दि. १४) पहाटे २.३० च्या दरम्यान ही घटना घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुरक्षा अधिकारी संतोष कचरू लांडगे (वय ४५ रा. देहरे ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारचे दैनंदिन कामकाज संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत बंद करण्यात आली होती.
त्यानंतर चोरट्यांनी इमारतीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून खिडकीच्या काचा फोडल्या. आत प्रवेश करून सर्व कपाटाचे दरवाजे तोडले व त्यामध्ये ठेवलेले कागदपत्रे अस्ताव्यस्त केली आहे.
त्यानंतर चोरट्यांनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आउट गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. क्लासरूमसह प्राचार्यांच्या रूमचे कुलूप तोडले व कपाटे, टेबल ड्रॉवरमधील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून नुकसान केले आहे.
सदरचा प्रकार शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टिक्कल करीत आहेत.