‘त्यांचे’ आंदोलन म्हणजे नौटंकी; ‘तो’ शिवाजी महाराजांचा अपमान नव्हता का?: आ.तनपुरेंवर भाजपचा पलटवार…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे सूत्र हलविणारा कारखाना म्हणून राहुरीचा कारखाना अग्रगण्य होता. या कारखान्याला तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना असे नाव दिले होते, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून आंदोलनाची नौटंकी करत आहेत.

त्यांच्याच कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून स्वतः च्या आजोबांचे नाव दिले हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडला. सदर घटना निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु या घटनेचे राजकारण करणे चुकीचे आहे. या घटनेचा निषेध म्हणून राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील सहकारी चळवळीतील अग्रगण्य असा असणारा आजचा तनपुरे सहकारी साखरकारखाना त्यावेळी राहुरी कारखाना म्हणून प्रसिद्ध होता.

या कारखान्याला त्यावेळी तत्कालीन तनपुरे विरोधक असलेल्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना असे नाव कारखान्याला दिले होते.

परंतु तनपुरे कुटुंबीयांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना पुढे करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिलेले नाव छन्नी हातोड्याने तोडून सदर कारखान्यास डॉ. बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना असे नाव दिले.

त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला नाही का? असा सवाल उपस्थित करत आज मालवण येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून तनपुरे आंदोलन करत आहेत.

परंतु सदरचे आंदोलन म्हणजे नौटंकी असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली स्टंटबाजी आहे असेही म्हटले आहे. राज्य सरकारने गेल्या काही दिवसात घेतलेल्या योजना यामुळे महिला वर्गामध्ये तसेच नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या घटक पक्षाबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे.

त्यामुळे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही घटनेचा स्टंट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु मतदार संघातील जनतेला विकास कामे व सर्वसामान्यांची कामे कोण करतो याची माहिती आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने अपमान करणाऱ्या विद्यमान आमदार तनपुरे यांच्या नौटंकीला कोणीही गांभीर्याने घेत नाही असेही म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe