Ahmednagar News : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.नुकतीच याबाबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीस राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी त्यांना वाढीव मतदानकेंद्रांची माहिती देण्यात आली. याशिवाय मतदारयादीचा नवीन कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाबाबतदेखील त्यांना माहिती देण्यात आली. २५ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे. या यादीवर ९ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती मागविण्यात येतील.
नवीन मतदार नोंदणी, मयत मतदारांची वगळणी व इतर स्थलांतर आदी प्रक्रिया राबविण्यासाठी शनिवारी आणि रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीर होईल. त्यानंतर अंतिम मतदारयादी २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.
आगामी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आवश्यक असणारे मतदानकेंद्र, मतदारयादी तसेच इतर विविध कामांची पूर्वतयारी करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.
लोकसभेसाठी जिल्ह्यात ३६ लाख ५९ हजार मतदार होते. ७३१ मतदानकेंद्र होती. जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. आयोगाच्या आदेशानुसार चौदाशे मतदारसंख्येसाठी एक मतदानकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. लोकसभेसाठी ३ हजार जण तडीपार करण्यात आले होते.
त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेने आता नवीन ३२ केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी आता जिल्हाभरात ३ हजार ७६३ मतदानकेंद्र असतील.अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.