अहमदनगर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण विभागास पालकांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी सांभाळताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकतीच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या संयोजनात बदल्या झाल्याने रिक्त झालेल्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी.
यासाठी संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांची चक्क पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवत अनोखे आंदोलन केले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. दरम्यान समायोजनात बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक येईपर्यंत शिक्षकांना आहे त्याच जागेवर ठेवण्याच्या सुचना जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्याने पालकांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.

श्रीगोंदा शहरातील तसेच तालुक्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनात बदल्या झाल्याने अनेक ठिकाणी शिक्षक संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा झाला होता. त्यातच काही शिक्षकांनी झालेल्या समायोजन बाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्याने शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी संबंधित शाळांवर भेट देऊन पाहणी करत काही शिक्षकांचे समायोजन रद्द केले.
तर काही ठिकाणी दोन पैकी एका शिक्षकाला पुन्हा माघारी पाठविल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला. अनेक वेळा शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने पालकांचा उद्रेक होऊन पालकांनी आपल्या पाल्यांना श्रीगोंदा पंचायत समितीच्या आवारात घेऊन येत चक्क विद्यार्थ्यांची पंचायत समिती आवारातच शाळा भरवत आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली. मुलांच्या परिक्षा जवळ आल्या असताना शिक्षकांच्या बदल्या केल्या जात असल्याने पालकांचा उद्रेक होत आहे.