अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी सुरु आहे.
मात्र जिल्हा रुग्णालयात कोरोनाने मयत झालेले नागापूर पंचक्रोशीतील मृतदेह दिले जात नसल्याची तक्रार नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
नागापूर भागाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मृतदेह कैलासधाम या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी देण्याची मागणी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जागा अपुरी पडत असताना नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी स्विकारली.
अल्पदरात सामाजिक भावनेने अंत्यविधीचे काम सुरु आहे. नागापूरच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ शहरापेक्षा जवळच्या ठिकाणी अंत्यविधी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खाजगी हॉस्पिटलमधून सदर स्मशानभूमीत विधीपूर्वक अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात आहे.
मात्र जिल्हा रुग्णालयातून मृतदेह देण्यास अडवणुक केली जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. सध्या अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम व सावेडी येथील कचरा डेपो देखील कमी पडू लागले आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी देखील अंत्यविधीसाठी महापालिकेच्या माध्यमातून नागापूरला अंत्यविधीसाठी परवानगी दिली होती.
तरी सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, वडगाव गुप्ता, निंबळक या पंचक्रोशीतील कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह नागापूर येथील स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी देण्याची मागणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम