Ahmednagar Breaking : लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. अशातच मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
शिवसेना पक्षाकडून पाच वेळा आमदारकी भूषवलेल्या बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ऐन निवडणुकांपूर्वी उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
खरे तर आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबनराव घोलप यांना निवडणूक लढवायची होती. त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटात अचानक माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांची इंट्री झाली.
वाघचौरे यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर बबनराव घोलप कमालीचे नाराज होते. घोलप यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपुढे मांडली होती. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे बोलले जात होते.
पण, उद्धव ठाकरे यांच्या नगर दौऱ्याच्या वेळी घोलप यांनी हजेरी लावली नाही. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणे महत्त्वाचे समजले. मुंबईत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या समवेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
दरम्यान याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना मी उबाठा शिवसेना पक्षाला राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. यानुसार त्यांनी आता उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रसंगी बोलताना बबनराव घोलप यांनी “आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने काम केले आहे.
मला पक्षाने जे जे सांगितलं, ते प्रामाणिकपणे केलं आहे” असं म्हटल आहे. तसेच “अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन मला काढून अपमानित करण्यात आलं. मी जे निष्क्रीय पदाधिकारी काढले होते, नवीन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले हे कितपत योग्य आहे” असा सवाल उपस्थित केला असून उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा मी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
याविषयी पुढे बोलताना बबनराव घोलप यांनी “पक्षाने एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत, ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदं दिली, हे सर्व पाहून मी अचंबित आहे.
नेमकं माझ काय चुकलं ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाल नाही” असे म्हणतं आपली नाराजी स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपली वकिली करणारे देखील यावेळी गप्प असल्याचे पाहायाला मिळाल्यामुळे मी शिवसैनिक पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, राजकीय वर्तुळात बबनराव घोलप हे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात जातील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत त्यांनी अजून कोणतीच माहिती दिलेली नाही.
मात्र उद्धव ठाकरे यांच्या नगर दौऱ्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याने ते आता एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील असे चित्र तयार होत आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच पाच टर्म आमदारकी भूषवलेल्या बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.