अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा येत्या एक-दोन दिवसांत असा विस्तार नियोजित असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची उत्सुकता आहे.
साध्या अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सहा व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे एक असे सात आमदार या शर्यतीत आहेत. त्यापैकी कोणाची वर्णी लागते हे लवकरच समजणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत.
कर्जत-जामखेडचे आमदार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचे नाव संभाव्य मंत्रिपदाबाबत आघाडीवर आहे, पण त्याचबरोबर अकोल्याचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांचा पराभव करणारे डॉ. किरण लहामटे यांचेही नाव जोरात आहे.
किंबहुना, सोमवारी सायंकाळी त्यांचेच नाव अंतिम झाल्याचेही सांगितले जात होते. पण स्थानिक राष्ट्रवादीच्या सूत्रांनी मात्र अद्याप कोणाचेही नाव अंतिम झाले नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे पवार व लहामटे यांच्याव्यतिरिक्त कोपरगावचे आशुतोष काळे, राहुरीचे प्राजक्त तनपुरे, नगरचे संग्राम जगताप व पारनेरचे नीलेश लंके यांचीही नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.