हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून फिरले माघारी …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शारदीय नवरात्रोत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. कोरोनामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर माथा टेकून माघारी फिरले.

देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मशाली पेटवून नेल्या. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे व अस्मिता भिलारे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. वेदशास्त्रसंपन्न बबन देवा कुलकर्णी, राजूदेवा मुळे, भूषण देवा साकरे, शरद देवा कोतनकर यांनी पौरोहित्य केले.

वेध मंत्रोच्चाराने गाभारा दुमदुमला पण स्पीकर नसल्याने मंदिराबाहेर नीरव शांतता होती. घटस्थापनेला विश्वस्त अशोक दहिफळे, भीमराव पालवे, आदिनाथ आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहायक अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते.

दुपारनंतर प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, न्यायाधीश शरद देशमुख, अॅड. विजय वेलदे,पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे आदींनी भेट देऊन पाहणी केली. रविवारपासून मोहटा गडाकडे येणारे सर्व रस्ते बंद करून सर्वसामान्य भाविक, पायी येणारे भाविक, नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.मोहटा देवस्थान समितीने एसटी पार्किंग जवळील कमानी पुढे देवीचा मोठा फोटो लावून भाविकांना दर्शनाची सोय करण्याची मागणी होत असली तरी त्यावर अंतिम निर्णय प्रांताधिकारी घेऊ शकतील, असे सांगण्यात आले.

देवस्थान समितीने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सकाळ-सायंकाळ आरत्या देवी पाठ सप्तशती पाठ ६४ योगिनी पूजन असे विधी होतील.अन्य सर्व उत्सवांना फाटा देऊन शनिवारी मुखवट्याची मिरवणूक निघाली नाही. पालखी उत्सव सुद्धा होणार नाही. कुस्त्यांचा हंगामा रद्द करण्यात आला आहे.

धामणगाव देवी, शहरातील कालिकामाता, कदम मंदिर, तिळवण तेली समाज, हिंगलाज माता, चौंडेश्वरी मंदिर, गाडगे अमराई, चिंतामणी मंदिर,आष्टवाडा व आखार भागातील चौंडेश्वरी मंदिर येथे घटस्थापना झाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved