श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रीमंत वस्ती येथील कांताबाई ढवळे या शेतात आपल्या शेळ्या चारत असताना, दोन बिबट्यांनी उसातून येऊन त्यांच्या दोन शेळ्या ठार करून उसात नेल्या.
तसेच गावातील भाऊसाहेब ढवळे यांच्या गायीवर देखील हल्ला केला व त्यांच्या पाळीव कुत्र्याला जखमी केले. एवढेच नाही तर पप्पू गायकवाड यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला देखील बिबट्याने फास्ट केले आहे. सुभाष लोंढे यांच्या घरासमोरील कुत्र्याला जिवे मारले, तर दुसरा कुत्रा जखमी केला.
या व अशा अनेक घटना गावात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ढवळगावात बिबट्याने दहशत निर्माण केली असून, वाडी-वस्त्यांवरील अनेकांच्या गायी-शेळ्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. बिबट्याने कुत्र्यांना भक्ष्य केल्याने अनेकांच्या दारात आता कुत्रा दिसत नाही.
त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होतात आहे.