प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाश्याना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचेच पडसाद नगर जिल्ह्यात देखील उमटू लागले आहे.
दरम्यान एसटी महामंडळाचे अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ४ हजार ५०० वर कर्मचारी मंगळवारपासून संपात सहभागी झाल्याने सर्व आगारातील बससेवा ठप्प झाली आहे. महामंडळाचे जिल्ह्यातील रोजचे सुमारे ५५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

राज्याच्या एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत ऐन दिवाळीत संप सुरू केला. नंतर तो मागेही घेण्यात आला होता. मात्र महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी अमान्य झाल्याने पुन्हा संप सुरू करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व म्हणजे ११ आगारातील व दोन कार्यशाळांतील (सर्जेपुरा व तारकपूर) सुमारे साडेचार हजारावर कर्मचारी संपात सहभागी झाले. परिणामी प्रवाशांचे खूप हाल होऊ लागले आहेत. यामुळे प्रवाश्यांचे हाल सुरु असून त्याचबरोबर एसटी महामंडळाची देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान अद्याप पर्यंत यावर तोडगा निघाला नाही आहे, दरम्यान राज्य सरकारने राज्याती अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. यातच अनेकांना निलंबित देखील केले आहे. यामुळे आता हा संप चिघळण्याची शक्यता वाढली आहे.