व्हॅलेन्टाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर आला असून यामुळे लाल गुलाबांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या फुलांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या २० नगास १६० ते १८० रुपये भाव मिळत आहे.
येत्या शुक्रवारी (दि. १४) व्हॅलेन्टाईन डे आहे. या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाबाचे फूल देण्याची प्रथा आहे. या पाश्र्वभूमीवर गुलाबाची आवक वाढली आहे.
गेल्या रविवारी गुलाबास १२० ते १४० रुपये भाव मिळाला होता. तो आज वाढला आहे.
गेल्या वर्षी साधारणपणे २०० रुपये भाव मिळत होता. सोशल मीडियाच्या जमान्यात इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत असताना लाल गुलाबासही मागणी आहे. मात्र, ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. कष्टाच्या तुलनेत भाव कमी मिळतो.
त्यातच फवारणी करत जास्त निगा राखावी लागत असल्याने शेतकरी गुलाबाची लागवड कमी प्रमाणात करत आहेत. नेहमीच्या तुलनेत ७० टक्केच लागवड केली जाते.