Ahmednagar News : राहुरी शहर व तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामांना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना कार्यारंभ आदेश अद्यापही प्राप्त न झाल्याने राज्यातील गतिमंद सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली
आज मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकात सांगण्यात आले, की ८ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी-मांजरी रस्त्यावर राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांना
तसेच तलाठी कार्यालयांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल सरकारच्या विरोधात आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंतप्रधान ग्रामसडक विभागाचे उपअभियंता एस. जी. गायकवाड यांनी ही कामे १७ सप्टेंबरपर्यंत सुरु करू, असे सांगितले होते. त्यास एक महिना होऊनही या कामाना कार्यारंभ आदेश प्राप्त न झाल्याने
राज्यातील गतिमंद सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मंगळवार तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.