अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आहे परंतू सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरठयामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. वीज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य व निष्काळजी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संयम व शांतता असली तरी, ग्रामीण भागातील वीजेच्या गंभीर होत चाललेल्या प्रश्नाची वेळीच दक्षता घेतली नाही तर, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा कधीही उद्रेक होवू शकेल असा इशारा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
शिर्डी मतदार संघासह जिल्ह्यातील अन्यही तालुक्यात सध्या वीजेच्या प्रश्नाने ग्रामीण भागातील नागरीक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. गोदावरी व भंडारदारा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू असून उपसा सिंचन योजनांना विज वितरणाच्या अनियमित विज पुरवठयाचा प्रचंड फटका बसत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा कोणताही लाभ होत नसल्याच्या कारणाने गोदावरी व भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आ.विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आणि मोजक्या शेतकरी प्रतिनिधीची बैठक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाने आ.विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
याप्रसंगी विज वितरण कंपनीचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गोसावी, श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बंड, बाभळेश्वरचे उपअभियंता विठ्ठल सोनवणे, उपअभियंता देशमुख यांच्यासह प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी बैठकीत आ.विखे पाटील व शेतकऱ्यांनी वारंवार होत असलेल्या खंडीत विजेच्या प्रश्नाचे गांर्भीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी इतका विजेचा खेळखंडोबा कधीच झाला नव्हता. मागील सरकारच्या काळात वीज खंडीतही होत नव्हती. नियमानूसार भारनियमन सुरु असायचे, शेतकरी त्यानूसार नियोजन करीत होते. मग आताच अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ठरवून दिलेल्या भारनियमनापेक्षाही जास्त वेळ वीज खंडीत होत आहे,
असा सवाल आ.विखे यांनी उपस्थित केला.अधिकाऱ्यांनी भारनियमनाचे वेळापत्रक निश्चित करावे, शक्य असेल तर वीज वितरीत करण्याचे चार चार दिवसांचे गावनिहाय भाग करावेत असे सूचित करुन आ.विखे यांनी सांगितले की,ज्या फिडरवर अतिरीक्त विजेचा भार असेल तिथे बेकायदेशीर वीज कनेक्शन शोधून तातडीने कारवाई सुरू करा,असे त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
केवळ कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी शांत आहेत.आंदोलन करण्याची सध्याची परिस्थिती नाही, म्हणून वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता वेळीच गांर्भीयाने वीजेचा प्रश्न निकाली काढावा. शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावर येण्याची वाट पाहू नका, असा इशारा आ.विखे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®