अहमदनगर : अनेकदा मोठे रस्त्यामुळे अपरिचित असलेली अनेक लहान गावे जगाच्या नकाशावर येऊन त्या गावाचे अर्थकारणच बदलून जाते. परंतु नगर तालुक्यातील एक गाव याला अपवाद ठरले आहे.
तालुक्यातील अरणगांव नॅशनल हायवेच्या कामामुळे गाव अडचणीत सापडले असून, गावाच्या भौगोलिक रचनेचा गांभार्याने अभ्यास न करता सुरू असलेले रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने अरणगांवमधील ग्रामस्थांसह सरपंचांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसल्याची दखल आ.निलेश लंके यांनी घेतली. त्यांनी तातडीने प्रकल्प संचालकांना अरणगावला अडचणीचा ठरलेला नॅशनल हायवेचा मार्ग सुधारून गावकऱ्यांना सोयीचा मार्ग करून देण्याची मागणी केली आहे.
नॅशनल हायवेचे काम करताना बसस्टाॅप काढल्याने बससाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव, गावकरी मंडळी यांच्यासमोर कोठे उभे रहावे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. अनेक ठिकाणी भुयारी मार्ग असणे अत्यंत आवश्यक असताना तो केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
चौका दरम्यान दोन्हीही बाजूने सर्व्हिस रोड, ड्रेनेजची व्यवस्था गरजेचे असताना गावाकडे दुर्लक्ष करून नॅशनल हायवेचे काम जोमात चालले असल्याने अरणगांवमधील ग्रामस्थांना बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. तरी महामार्गाचे काम सुरू असताना संबंधित मार्गावरील गावांना हे महामार्ग अडचणीचे ठरणार नाहीत, याची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी मागणी होत आहे.