चंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोल्हार भगवतीपूर येथे गेल्या काही दिवसांपासून चोरटयांनी चंदनाच्या झाडांची चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

नुकतेच चोरटयांनी अमरधाम मधील चंदनाची चोरी केली आहे. दरम्यान वाढत्या चोर्‍यांमुळे ग्रामपंचायतचा वैताग वाढला आहे.

दरम्यान या वाढत्या चोरीच्या घटनांना त्रासून कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने याप्रकरणाची लोणी पोलिस ठाण्यात फिर्याद देखील दिली होती.

मात्र पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप गावकरी करत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसापूर्वी कोल्हार भगवतीपूरच्या अमरधाममधून चंदनाचे झाड तोडण्यात आले.

यापूर्वी एक – दीड महिन्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी येथून दोन चंदनाची झाडे तोडून नेली. त्यावेळी कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी लोणी पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली. याखेरीज चंदन चोरट्यांच्या उच्छादाबद्दल पोलिसांना वारंवार सांगून देखील कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही.

चंदन चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा या मागणीसंबंधीचे पत्र ग्रामपंचायतच्यावतीने लवकरच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले.