अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या निगराणीत सुरू आहे.
कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून विवेक कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र याच मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अलकादेवी राजेंद्र जाधव यांनी सोमवारी आपला अर्ज माघारी घेतला.
त्याचसोबत बुधवारी बिपिनदादा शंकरराव कोल्हे, किसनराव चंद्रभान पाडेकर व देवेंद्र गोरख रोहमारे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान काल तब्बल २५ अर्ज माघारी घेतले गेले. तर गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. त्या नंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी सन १९५८ मध्ये जिल्हा सहकारी बँकेची स्थापना झाली. मागील सहा दशकांच्या वाटचालीत शेतकरी हिताचे अनेक पथदर्शी निर्णय बँकेने घेतले.
ज्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर झाली. पक्षीय गटबाजी बाजूला ठेवित जुन्या- जाणत्यांनी बँकेच्या कारभाराची दिशा निश्चित केली. त्यामुळे जिल्हा बँकेचा प्रगतीचा आलेख चढता राहिला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात प्रत्यक्षात सुरु झाला आहे.
उमेदवारी दाखल करण्याच्या सोमवार दि. २५ जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंत जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या समक्ष झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर १९८ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. मात्र दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
सुरवातीला ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत होती, परंतु जसा जसा अर्ज माघारीची मुदत जवळ आली तसे चित्र पालटले.त्यामुळे चुरशीच्या निवडणूकी ऐवजी समझोत्याची निवडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved