अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना पेशंटची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने काही नियमअटींसह नागिरकांना आपले व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे.
यामधून तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांना भेटी देणं किंवा गर्दी करणायास बंदी आहे. मात्र, नगर जिल्ह्याच कोकण अशी ओळख असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे.
करोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या शहरांतून हे पर्यटक येत असल्याने भिती वाढली आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा परिसर सध्या गजबजून गेला आहे.
सामान्यांना ई-पास मिळणे दुरापास्त अशा वेळी विविध स्टीकर लावलेली वाहने घेऊन आलेल्या या पर्यटकांमुळे परिसरातील ग्रामस्थांना धडकी भरली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. नगरसह, मुंबई, पुणे, नाशिक भागातील हे पर्यटक आहेत.
वाहनांवर अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन, पोलिस, भारत सरकार, प्रेस, व्हीआयपी अशी विविध प्रकारची स्टीकर्स लावलेली असल्याचे दिसून येत आहे.
याचाच अर्थ करोना काळात सेवा देता यावी, यासाठी देण्यात आलेल्या सवलतीचा गैरफायदा अगर बनावट वापर करून ही मंडळी मौजमजा करण्यासाठी भंडारदरा परिसरात आल्याचे दिसून येते.
शनिवारी आणि रविवारी अशी शेकडो वाहने या परिसरात आली होती. त्यातून आलेले पर्यटक, रस्त्यावर, दऱ्याखोऱ्यांत, झऱ्यांजवळ फिरताना दिसत होते. काहींनी तर मद्यपान करून गोंधळ घातल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे.
यामुळे करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका असल्याकडे सरपंच पांडुरंग खाडे यांनी लक्ष वेधले आहे. येथे येणारे पर्यटक पोलिस किंवा सरकारी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक आहेत काय, त्यांना ही सवलत कोणी दिली,
कारवाई का केली जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. करोना संसर्ग नियंत्रण समितीचे सरपंच अध्यक्ष असतात. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, तर या समितीचा राजीनामा देण्याचा इशाराही खाडे यांनी दिला आहे.
काही ठिकाणी पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही पर्यटकांनी त्यांनाच दमबाजी केल्याचे सांगण्यात आले.
काहींनी वरिष्ठांशी संपर्क करून देत आपली वाट मोकळी करून घेतली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पोलिस आणि वनविभागाचे अधिकारीही यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved