संतप्त कामगारांचा आत्मदहनाचा इशारा अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त चर्चेसाठी गैरहजर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे असताना चर्चेला विश्‍वस्त येत नसल्याने कामगारांना तारखेवर तारीख मिळत आहे.

शुक्रवारी (दि.15 जानेवारी) रोजी सदर प्रकरणाच्या तारखेला विश्‍वस्त दुपारी उशीरा पर्यंत हजर न राहिल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे पदाधिकारी व कामगार सभासदांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या मांडला.

तर न्याय मिळत नसेल तर आत्मदहनाचा इशारा देखील दिला. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे.

कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सहा ते सात तारखा झाल्या.

यापैकी एकाच तारखेला विश्‍वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा तीन हजार दोनशे तीन वर्षासाठी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने त्याला विरोध करण्यात आला. तर दरमहा पाच हजार तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा सहा हजार रुपये पगारवाढ देण्याची मागणी करण्यात आली.

एकाच तारखेला हजर राहून आपली आडमुठी भूमिका मांडणार्‍या व चर्चेसाठी तारखेला विश्‍वस्त हजर राहत नसल्याचा कामगारांनी यावेळी निषेध नोंदवला. सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी युनियनला पुढील सदर प्रकरणाची दि.21 जानेवारीची अंतिम तारीख दिली आहे.

यावेळी चर्चेने मार्ग निघेल किंवा सदर प्रकरण नाशिक कामगार आयुक्तांपुढे जाणार आहे. युनियनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की, युनियनच्या कामगारांनी वेतनवाढीची अवाजवी मागणी केली नसून, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या पध्दतीने कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे.

ट्रस्टने कोरोना काळात जमीनीचे व्यवहार करुन संरक्षक भितीचे काम देखील सुरु केले. तेंव्हा पैश्यची अडचण निर्माण झाली नाही. फक्त कामगारांनी नियमाप्रमाणे पगारवाढ मागितल्यास त्यांना पैश्याची अडचण दाखवली जात आहे. ट्रस्टचा बॅलन्शीट चांगला असून कोट्यावधीची उलाढाल सुरु असताना कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज आहे.

अन्यथा कामगार रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, ट्रस्ट कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी येत नसल्याने तारखेवर तारीख मिळत आहे. ट्रस्टवर कामगार आंदोलनाने दडपण आनत नसून, विश्‍वस्त चर्चेला येत नसल्याने हा वाद चिघळत आहे.

कामगार हे ट्रस्टचेच असून, त्यांना न घाबरता विश्‍वस्तांनी चर्चेला आल्यास हा प्रश्‍न सुटणार असल्याचे स्पष्ट केले. तर अवतार मेहेरबाबा यांनी वंचित, दुर्बल घटकांना आधार देण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन कामगारांच्या कल्याणासाठी पगारवाढ दिल्यास ट्रस्टला काही कमी पडणार नसल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment