Ahmednagar News : भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिलेल्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाने धरणातून पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेली अनेक वर्षे भोजापूर पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी लढा देत आहे. यंदा पाऊस नसल्याने भोजापूर धरणातील पाण्याचा लाभ मिळावा, अशी मागणी घेवून शेतकऱ्यांनी गावोगावी आंदोलन सुरू केली होती.
मात्र प्रशासकीय स्तरावर निर्णय होत नव्हते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरात बैठक घेवून पाणी सोडण्याबरोबरच चारीच्या कामाला तातडीने सुरूवात करण्याचे आदेश दिले होते.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेवून पाणी सोडण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी पिंपळे गावापर्यंत येईल.
पुढे सोनेवाडी आणि वडझरी पर्यंत नेण्यासाठी जलसंधारण विभागाने नियोजन केल्याने लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत प्रथमच भोजापूर धरणाचे पाणी पोहचणार असल्याचे सांगण्यात येते. या महत्वपूर्ण निर्णयाचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.
निळवंडे लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या गावातील शेतकऱ्यांना भोजापूर धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा, ही अपेक्षा होती. पण गेली अनेक वर्ष याबाबत निर्णय झाले नाही. चारीच्या कामाचे टेंडर अनेक वेळा निघाले. अनेकांनी कामाचे ठेके घेतले, पण चारीचे काम होत नसल्याने शासनाच्या पैशाचाही अपव्य झाला.
यंदा धरण भरले तरी पाणी मिळू शकत नाही आशी परीस्थीती सहन न झालेले शेतकरी रस्त्यावर उतरून पाण्यासाठी रात्रंदिवस संघर्ष करीत होते. याची गंभीर दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय स्तरावर मागील तीन चार दिवसात केलेल्या निर्णय प्रक्रीयेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर विश्रामगृहात याबाबत अधिकाऱ्या समवेत बैठक घेतल्यानंतर जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला. खास बाब म्हणून निर्णय घेण्याची मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून चारीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेशही जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या भोजापूर धरणाच्या पाण्याचा लाभ संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कधीच झाला नाही. हक्काचे पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात नेहमीच अडचणी निर्माण केल्या गेल्या.
मात्र युती सरकारने वर्षानुवर्षे प्रलंबित राहीलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे नगर जिल्ह्याच्या वाट्याचे ३३ टक्के पाणी मिळण्याचा मार्ग प्रथमच मोकळा झाला आहे.
निळवंडे कालव्या प्रमाणे भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यानांही युती सरकारमुळे दिलासा मिळणार असून, निळवंडे पासून वंचित राहीलेल्या गावांना आता भोजापूर धरणातील हक्काचे पाणी मिळणार आहे.
आज सोडण्यात आलेले पाणी निमोण, पळसखेडे, कहें आणि पिंपळे बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर उर्वरीत गावांपर्यंत पोहचणार असल्याने ऐन टंचाईच्या काळात यासर्व गावांना दिलासा मिळणार आहे.