Ahmednagar News:फरारी अरोपींच्या अटकेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत अहमदनगर जिल्हा पोलिसांनी नवा विक्रम नोंदविला आहे. फरारी आरोपींपैकी तब्बल ३० ते ३५ टक्के आरोपी अवघ्या काही दिवसांच्या मोहिमेत पकडण्यात आले आहे.
अलीकडच्या पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी तब्बल ८८ आरोपी केवळ दोघा पोलिसांनी पकडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार संदीप पवार आणि लक्ष्मण खोकले या दोघांनी प्रत्येकी ४४ आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्यासह इतर अंमलदारांच्या कामगिरीबद्दल रिवॉर्ड देण्यात येणार आहेत. तर हे आरोपी इतके दिवस का पकडले गेले नाहीत, अशी विचारणा पोलिस ठाण्यांना करण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार आरोपी फरार आहेत. त्याच गुन्ह्यानंतर फरार झालेले आणि शिक्षा भोगत असताना तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आलेले यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यापांसून हे आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची पथके यासाठी कार्यरत करण्यात आली आहेत. सुमारे सोळाशे आरोपींना पुन्हा पकडण्यात आतापर्यंत यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फरारी आरोपी एकदम पुन्हा पकडले जाणे अवघड असते. हे काम नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी करून दाखविले असल्याचे पाटील यांनी सांगितले.