कोपरगाव- संगमनेर मार्गावरील झगडे फाटा ते जवळके या १० ते १२ किलोमीटर रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मागील वर्षी सुमारे १० कोटी रूपये मंजूर केले होते. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम झाले; पण अवघ्या एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली. डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी निघून गेल्यामुळे खड़ी उघडी पडली असून ठेकेदाराच्या कामाचेही पितळ उघडे पडले आहे.
झगडे फाटा ते संगमनेर या रस्त्यावरील टोलनाका गेल्यानंतर असलेल्या झगडे फाटा ते जवळके दरम्यान रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून भयंकर दुरवस्था झाली होती. त्यात शिर्डीच्या सुरक्षेच्या कारणाखाली झगडे फाटा मार्गे अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून वळविण्यात आली.
त्यामुळे झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या रस्त्यावर १० ते १२ किमी अंतरात जीवघेणे खड्डे होते. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी बिकट अवस्था झाली होती.
खड्डे चुकविण्याच्या नादात रोजच अपघात होत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याची मागणी केली होती. याची दखल घेत आमदार काळे यांनी या रस्त्यासाठी १० कोटीचा निधी मिळविला होता.
त्यानंतर या रस्त्याचे काम झाल्याचे सांगितले जाते. पण अवघ्या एका पावसात या रस्त्याची पुन्हा वाट लागली आहे. डांबरीकरणाचा थर अनेक ठिकाणी निघून गेला असून खडी उघडी पडली आहे, तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
पावसाळ्याची सुरुवात झाली असून पहिल्याच पावसात जर रस्त्याची अशी परिस्थिती झाली असेल तर पुढे येणाऱ्या एक दोन पावसात तर या रस्त्याचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणारच नाही.
याबाबत संबंधीत यंत्रणेला काहीच सोयरसुतक नाही. याकडे आमदार काळे यांनी जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यामार्फत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व पुन्हा रस्ता दर्जेदार करून घ्यावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.
या रस्त्याचे काम चालू झाले तेव्हापासून आम्ही त्या ठेकेदाराला रस्त्याचे काम चांगले करण्याच्या सूचना देत होतो; परंतु तरीही त्याने ऐकले नाही. या मार्गावर मोठी गावे आहेत. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता दमदार व दर्जेदार होणे आवश्यक आहे. आता ठेकेदाराकडून पुन्हा या रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे.