अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोना सोबतच निसर्ग चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रात येऊन गेले. हे वादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून गेले. कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले.
तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातही या निसर्ग चक्रीवादळाने नुकसान केले होते. याचा परिणाम आता थेट पर्जन्यमानावर आणि पर्यायाने धरण भरण्यावर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे,
त्याला तज्ज्ञांकडून अधिकृत दुजोरा मात्र अद्याप मिळालेला नाही. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाचा विचार करता येथील सीना धरण शंभर टक्के भरले आहे. एवढ्या लवकर हे धरण भरण्याची हि पहिलीच वेळ आहे.
तर, दुसरीकडे उत्तरेतील भंडारदरा व निळवंडे धरण पन्नास टक्केच भरले आहे. मागील वर्षी भंडारदरा धरण दोन ऑगस्टला ओव्हरफ्लो झाले होते.
जून महिन्याच्या सुरवातीला आलेले निसर्ग चक्रीवादळ ज्या भागातून गेले, तेथे हवामानाचे गणित बिघडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
निसर्ग चक्रीवादळ पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांच्या भागातून गेले होते. नगर जिल्ह्यात अकोले आणि संगमनेर तालुक्यातून या वादळाच्या काही भागाचा प्रवास झाला होता.
नेमका तोच भाग मुळा आणि भंडारदरा या धरणांच्या पाणलोट क्षेत्राचा आहे. यावर्षी त्या भागात कमी पाऊस झाल्याने धरणांत पाणी येत नाही.
दुसरीकडे मात्र, खालच्या भागात पाऊस सुरू असून टक्केवारी वाढत आहे आणि छोटी घरणे, बंधारे भरत आहेत.
नगर-नाशिकच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर भरणारे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणही वरच्या धरणांतून पाणी सोडण्याआधीच पन्नास टक्के भरले आहे.
त्यामुळे निसर्ग वादळाचा परिणाम असल्याची चर्चा नगरसह नाशिक जिल्ह्याच्या भागातही सुरू झाली आहे. तज्ज्ञांकडून अधिकृत दुजोरा मात्र अद्याप मिळालेला नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा