Ahilyanagar News:-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर तरळतात ती दोन नावे म्हणजे एक शंकरराव काळे व दुसरे म्हणजे शंकरराव कोल्हे हे होय. तसे पाहायला गेले तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ किंवा तालुका म्हटला म्हणजे काळे आणि कोल्हे घराण्याचे राजकीय वर्चस्व आपल्याला दिसून येते.
या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये असो की इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये या दोन्ही घराणी अग्रस्थानी असून एकूण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणावर देखील काळे आणि कोल्हे घराण्याचा वचक किंवा एक दबदबा आहे.
यावेळी मात्र जर आपण बघितले तर या विधानसभा निवडणुकीत वेळीच विवेक कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला व आशुतोष काळे यांचा विजयाचा मार्ग त्यामुळे सुकर झाला व संपूर्ण राज्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे हे निवडून आले.
परंतु आता निवडून आल्यानंतर कोपरगावकरांना आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळेल अशी एक सगळ्यांना अपेक्षा आहे व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे निवडणूक कालावधीत अजित पवार यांनी जेव्हा कोपरगावमध्ये प्रचार सभा घेतली तेव्हा त्यांनी आशुतोष काळे यांना विजयी करा व त्यांना चांगली जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता कोपरगावकरांच्या अपेक्षा मात्र वाढलेल्या आहेत.
आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने ३० ते ३१ वर्षानंतर कोपरगावकरांना मिळणार मंत्रीपद?
आपण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर अगोदर शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे यांनी मंत्री म्हणून राज्याचे कामकाज पाहिलेले आहे. परंतु गेल्या 30 ते 31 वर्ष कोपरगावच्या नेतृत्वाला मात्र मंत्रिपद मिळालेले नाही.
त्यामुळे आता आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावकरांना मंत्रीपद मिळेल अशी एक अपेक्षा असून त्यामागे अजित पवार यांनी दिलेला शब्द देखील कारणीभूत आहे. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जेव्हा सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा बोलताना अजित पवार यांनी आशुतोष काळे यांना विजयी करा व त्यांना चांगली जबाबदारी देण्यात येईल असा शब्द दिलेला आहे.
आजपर्यंत जर आपण कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या बाबतीत बघितले तर या ठिकाणी 1978 मध्ये जेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुलोदचा प्रयोग झाला होता तेव्हा त्या सरकारमध्ये शंकरराव काळे हे शिक्षण राज्यमंत्री होते व तेव्हा ते पारनेरमधून आमदार म्हणून निवडून आले होते व त्यांनी त्या काळात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्याच्यानंतर मात्र शंकरराव कोल्हे 1990 मध्ये राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि सहकार मंत्री झाले व त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर कामाचा ठसा उमटवला.
इतकेच नाही तर 1991 मध्ये त्यांना राज्याचा महसूल विभागाचा कार्यभार देखील देण्यात आला होता. या कालावधीत म्हणजेच 1991 ते 93 या दरम्यान मंत्रिमंडळात खातेबदल करण्यात आले व तेव्हा शंकरराव कोल्हे यांना राज्याचे परिवहन, उत्पादन शुल्क व कमाल जमीनधारणा खात्याचे मंत्री बनवण्यात आले होते.
अशा पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे या दोघांनी एक दबदबा निर्माण केलेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होईल अशी एक शक्यता असून निवडणुकीत आशुतोष काळे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
आशुतोष काळे जवळपास एक लाख 24 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले असून अजित पवार यांनी दिलेल्या शब्दामुळे आता कोपरगावकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत व आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावकरांची मंत्रीपदाची अपेक्षा पूर्ण होईल अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. परंतु आता अजित पवार हे त्यांनी दिलेला शब्द पाळतील का आहे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.