लटकणाऱ्या तारांपासून सुटका होणार; वीजवाहिन्या होणार भूमिगत !

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत.

या कामासाठी 2 कोटी 30 लाख 80 हजार खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

सावेडीतील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा तोफखाना पोलिस चौकी ते भिस्तबाग चौकपर्यंतचा हा रस्ता शहरात बकळणार्‍या तारांतून कुष्ठधाम रस्त्याची सुटका मॉडेल ठरेल, असा प्रयत्न आ. जगताप यांचा आहे.

उपनगरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. महापालिकेमार्फत सुरू असलेल्या या कामात रस्त्यावरील विजेच्या खांबांचा मोठा अडथळा येत आहेत.

या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी विजेचे खांब हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार जगताप यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या.

या अधिकार्‍यांनी या रस्त्याचा सर्व्हे करून वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी 2 कोटी 30 लाख 80 हजार रुपये खच अपेक्षित आहे.

वर्षभरात हे काम करण्याची मुदत असून, महावितरणद्वारे कुष्ठधाम रस्त्यावरील मनपाच्या पथदिव्यांना भूमिगत केबल टाकून वीजपुरवठा केला जाणार आहे. या कामासाठी अपेक्षित खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे.