Ahmednagar News : जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वायरमनला रंगेहात अटक करण्यात आली असून याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात संतोष शांतिनाथ अष्टेकर (वय ४१, रा. खाडेनगर, जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड येथील रामेश्वरनगरमध्ये तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी त्यांच्या प्लॉटसमोर विद्युत वाहिनी असल्यामुळे विद्युतपुरवठा सुरू असताना समोरील बाजूचे बांधकाम करता येत नव्हते.

त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित करणे आवश्यक होते. त्यासाठी अष्टेकर याला वीजपुरवठा खंडित करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार अष्टेकर याने वीजपुरवठा खंडित करून दिला. मात्र, त्यासाठी पाचशे रुपये घेतले. असा पाच वेळा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.
अडीच हजार रुपयांची मागणी अष्टेकर याने केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी अष्टेकर याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तक्रारदाराच्या बांधकाम प्लॉटसमोर ही कारवाई करण्यात आली.