Wool Processing : अहमदनगर जिल्ह्यातील मौजे ढवळपुरी (ता.पारनेर) येथे ‘लोकर प्रक्रिया केंद्र’ स्थापन करण्यासाठी शासनाच्या १.७० हेक्टर जमिनीस मान्यता देण्यात आली आहे. मेंढपाळ बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांच्या मागणीला महायुती सरकारमार्फत न्याय देण्यात आला असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ढवळपुरी येथे लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन व्हावे आणि त्यासाठी शासनाची जमीन उपलब्ध व्हावी याकरिता माझे प्रयत्न सुरू होते आणि यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. आज त्या प्रयत्नांना यश मिळाले असून निश्चितच मेंढपाळ बांधवांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असा ठरणार आहे. कारण मेंढपाळांची पंढरी म्हणून ढवळपुरी गावाला ओळखले जाते. त्यामुळे लोकर प्रक्रिया केंद्र येथे स्थापन होणे ही काळाची गरज होती.
विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सदरील प्रकल्पास पारनेर तालुक्यातील करंदी येथे निर्माण करण्याचे नियोजन होते. कारण ढवळपुरी येथील के. के. रेंजमुळे हा प्रकल्प शासनाकडून नाकारण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान मेंढपाळ बांधवांची मागणी लक्षात घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील केंद्र निर्माण करण्याच्या अनुषंगाने ज्यांची कोणाची हरकत असेल तर तसे शासनास कळवावे. त्यावर योग्य तो विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे.
दरम्यान आज शासनातर्फे १.७० हेक्टर जमिनीस मान्यता देण्यात आली असून मेंढपाळ बांधवांचा प्रश्न हा सुटला आहे. मौजे ढवळपुरी येथील मेंढपाळांची संख्या व त्यांची असणारी मागणी या बाबींचा विचार करता मौजे ढवळपुरी ता. पारनेर, अहमदनगर येथे लोकर प्रक्रिया केंद्राची स्थापना झाल्यास मेंढपाळांसाठी सोयीचे होणार असल्यामुळे मौजे करंदी ता. पारनेर ऐवजी मौजे ढवळपुरी येथील ग. नं. १०२१ मधील क्षेत्र २ हे. १० आर पैकी निर्बाध्यरीत्या वाटपास उपलब्ध असलेले क्षेत्र १ हे. ७० आर एवढ्या शासकीय जमिनीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
तसेच मेंढपाळ बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांच्या मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.