अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ महिलेने केले मृत्यूपश्चात देहदान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर येथील लिंगायत समाजातील सुमनताई पोपटआप्पा गाडे (वय ७४) यांचा देहदान करण्याचा संकल्प त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलांनी पारंपारीक अंत्यविधी प्रथेला छेद देत पूर्ण केला आहे.

येथील बांधकाम व्यावसायिक व वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते गिरीष गाडे यांच्या मातोश्री सुमनताई यांचे नुकतेच निधन झाले. वीरशैव लिंगायत समाजात धार्मिक प्रथा परंपरेनुसार पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना खोल जमिनीत सुमारे चार ते पाच फूट खड्डा खोदून पार्थिव जमिनीत दफन केले जाते.

त्यावर समाधी बांधली जाते. परंतु या प्रथेला छेद देण्याचा आठ नऊ वर्षांपूर्वीच सुमनताई गाडे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला होता. आपला देह जमिनीत पुरून अथवा अग्निसंस्कार करून त्याचा समाजाला काय उपयोग होणार? या भावनेतून मनुष्य जन्म एकदाच मिळतो तेव्हा माझ्या देहाचा समाजाला फायदा व्हावा, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन माझ्या निधनानंतर देहदान करण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी मुलाजवळ व नातेवाईकांकडे व्यक्त केली होती.

त्याप्रमाणे देहदान करण्याचा अर्ज लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयात सादर केला होता. कै. गाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलांनी देहदान करून आईचा संकल्प पूर्ण केला आहे. त्यांच्या या क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!