अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोना विषाणुंचा फैलाव झपाट्याने होत असून रूग्णसंख्या आता ४४ वर पोहोचली आहे.
ग्रामपंचायतीकडून गर्दीचे नियमन होत असल्याने सुमारे शंभर युवकांनी ग्रामपंचायतीत धाव घेऊन संताप व्यक्त करत जनता कर्फ्युची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पुढील निर्णयासाठी तहसीलदारांना सोमवारी पत्र दिले. वांबोरी येथे कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमालीची वाढत आहे.
कोरोना रोखण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने आठवड्यात एक दिवस दर सोमवारी जनता कर्फ्युची घोषणा केली होती. परंतु, दोन महिन्यानंतर पुन्हा दुकानांसह बाजारपेठ खुली झाली. बहुतेकजण मास्कचा व सुरक्षीत अंतराचा नियम पाळत नसल्याने बाधीत रूग्णांची संख्या ४४ वर पोहोचली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
२८ जण बरे झाले असून १३ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा धोका वाढत असल्याने गावातील युवकांनी गाव बंदच्या मागणीसाठी सोमवारी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱयांसह प्रशासनाला धारेवर धरले. मंडल अधिकारी दत्ता गोसावी, तलाठी सतीश पाडळकर, ग्रामविकास अधिकारी बी. के. गागरे, भाऊसाहेब ढोकणे,
भानुदास कुसमुडे, कृष्णा पटारे, विशाल पारख, रवी पटारे, महेश काळे, उदय मुथा, श्रीकांत शर्मा, संकेत पाटील आदी उपस्थित होते. युवा ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेत संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यास प्रशासनाने सहमती दर्शवली. परंतु, दहा दिवस गाव बंद ठेवण्याबाबत तहसीलदारांना पुढील निर्णयासाठी पत्र पाठवण्याचे ठरले.
नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवले आहे. जर गावबंदची अंमलबजावणी केली नाही, तर युवक स्वतः बंद करण्यासाठी पुढे येतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved