Swaraj Code Tractor:- शेती आणि ट्रॅक्टर यांचे एकमेकांशी घट्ट असे नाते आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहे की,शेतीच्या प्रत्येक कामामध्ये आता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचतो. तसेच ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे स्वतःचे कष्ट खूप कमी झाले असून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करता येणे शेतकऱ्यांना आता शक्य झाले आहे.
त्यामुळे आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर खरेदी करतात. परंतु यामध्ये काही शेतकरी अल्पभूधारक असतात व त्यांना महाग असे मोठे ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही किंवा आर्थिक दृष्ट्या ते परवडत नाही. त्यामुळे असे शेतकरी मिनी ट्रॅक्टर किंवा छोटे ट्रॅक्टर घेण्याचा पर्याय निवडतात.
जर मिनी ट्रॅक्टर घ्यायला गेले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळी वैशिष्ट्य असलेले मिनी ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते.
परंतु त्यामध्ये कोणते ट्रॅक्टर घ्यावे याबाबत शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो. या अनुषंगाने जर तुमच्याकडे कमी जमीन असेल व तुम्हाला छोटा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि परवडणाऱ्या दरातला एक छोटा ट्रॅक्टर बाजारात सध्या आले असून शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
स्वराज कोड असे या ट्रॅक्टरचे नाव असून ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर खूपच उपयुक्त आहे व तितके टिकाऊ देखील आहे.
कसे आहे स्वराज कोड ट्रॅक्टरचे इंजिन?
हे ट्रॅक्टर एक सिलेंडर सह येथे व यात 11 एचपीचे इंजिन देण्यात आले आहे. शेतामधील तण काढण्याकरिता आणि फवारणीसाठी देखील हे ट्रॅक्टर अतिशय फायद्याचे ठरते. तसेच या ट्रॅक्टरचा आकार अतिशय लहान असल्यामुळे त्याला हाताळणे देखील अतिशय सोपे आहे.
हे ट्रॅक्टर 389cc च्या पावरफुल इंजिनसह येते व त्याचे इंजिन 3600 आरपीएम जनरेट करण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टरची पीटीओ पावर 9.46 HP असल्यामुळे इतर ट्रॅक्टरचलीत अवजारे चालवण्यासाठी हे ट्रॅक्टर फायद्याचे ठरते.
इंजिन जास्त गरम होऊ नये याकरिता त्यामध्ये वॉटर कुल्ड सिस्टम देण्यात आलेली आहे व इंजिनचे धुळी पासून संरक्षण करण्यासाठी ड्राय टाइप एअर फिल्टर देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरमध्ये सहा फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर्स देण्यात आले असून हे ट्रॅक्टर सिंगल क्लचसहित येते. या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 1.9 ते 16.76 किलोमीटर प्रतितास आणि रिव्हर्स स्पीड 2.2 ते 5.7 किलोमीटर प्रतितास इतका आहे.
कसे आहेत ब्रेक आणि स्टेरिंग व हायड्रोलिक पावर?
स्वराज कोड ट्रॅक्टरमध्ये कंपनीने ऑइल एमर्स ब्रेक दिले असून टायरवर पकड मिळवण्यासाठी अतिशय सक्षम असे ब्रेक आहेत व गुळगुळीत भागावर देखील चालवणे सोपे जाते व स्लीपेज कमी देते.
तसेच या ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल स्टेरिंगचा पर्याय देण्यात आला आहे ज्यामुळे ट्रॅक्टर वळवणे आणि मर्यादित जागेत काम करणे सोपे जाते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर 220 किलो वजनाची आहे व तीन पॉइंट लिंकेज टू वे फीचर यामध्ये देण्यात आले आहे.
ग्राउंड क्लिअरन्स 266 मिमी असून त्यामुळे खडबडीत किंवा खाली किंवा वरती अशी जमीन असेल तरी देखील हे ट्रॅक्टर सहजपणे अशा जमिनीवर फिरू शकते. या ट्रॅक्टरचे कॉम्पॅक्ट डिझाईन आणि टिकाऊ पणा यामुळे लहान शेतीसाठी हे एक चांगले ट्रॅक्टर आहे. स्वराज कोड ट्रॅक्टरचे वजन 455 किलो असून उंची 1180 मीमी व रुंदी 890 मीमी आहे.
तसेच यामध्ये दहा लिटरची इंधन टाकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतीमधील छोट्या कामांसाठी हा ट्रॅक्टर अतिशय फायद्याचा आहे. तसेच स्वराज कोड ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येतो.तसंच या ट्रॅक्टरची चाके आणि टायर हे नांगरणी तसेच फवारणी व इतर काही महत्त्वाच्या शेतीची कामे सहजतेने करता येतील या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
स्वराज कोड ट्रॅक्टरची भारतातील किंमत 2 लाख 59 हजार 700 ते 2,65,000 हजार रुपयापर्यंत आहे व ही त्याची एक्स शोरूम किंमत आहे. परंतु भारतातील काही राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये रोड टॅक्स आणि आरटीओ शुल्कामुळे किमतीत काही बदल होऊ शकतो. तसेच कंपनीने या ट्रॅक्टर वर एक वर्षाची वारंटी देखील दिली आहे.