साधारणपणे 2012 चा कालावधी होता व या कालावधीमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या कारने धमाल केली होती त्यामध्ये प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट इंडियाची 5 सीटर असलेली डस्टर देखील लॉन्च झाली होती व या कालावधीत या डस्टरने देखील SUV कार श्रेणीमध्ये खूप मोठी धमाल केली होती.
तुम्ही त्या कालावधीतल्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील ही कार पाहिली असेल. परंतु रेनॉल्ट इंडियाच्या रेनॉल्ट डस्टरने अनेक वर्ष मार्केटवर एक प्रकारचा ताबा मिळवला होता. परंतु कालांतराने या कारमध्ये काही अपग्रेड करणे महत्त्वाचे होते व ती स्वतःचा अपग्रेड करू शकली नाही व तिची विक्री घसरली.
कालांतराने ग्राहक वर्ग घटल्याने ही कार बंद करावी लागली होती. परंतु आता हीच रेनॉल्ट डस्टर नव्या अवतारामध्ये पुन्हा भारतीय बाजारावर अधिराज्य गाजवण्यासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ही कार 7 सीटर स्वरूपात येणार असून तिच्या मागच्या एडिशनपेक्षा ती मोठी दिसणार आहे. त्यामुळे या लेखात आपण या कारमध्ये काय बदल केले जाऊ शकतात किंवा तिचे वैशिष्ट्ये काय असतील? त्याबद्दलची माहिती घेऊ.
रेनॉल्ट डस्टर लवकरच अवतरणार नव्या रूपात
1- डिझाईनमध्ये असेल नाविन्यपूर्ण– अनेक मीडिया रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार बघितले तर रेनॉल्ट कंपनीच्या माध्यमातून या नवीन डस्टरच्या एकंदरीत रचना व डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार असून ती संपूर्णपणे नवीन शैलीत सादर करण्यात येणार आहे. यावर्षीच्या सणासुदीच्या कालावधी सुरू होण्याच्या आधी ही कार लॉन्च केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार या नवीन डस्टरचे पुढची तसेच मागची प्रोफाइल पूर्णपणे बदलले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या कारपेक्षा या नवीन कारची लांबी चार मीटर पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. साधारणपणे या कारमध्ये पाच मोठे व्यक्ती व दोन लहान मुले बसण्याची जागा असू शकते.
2- इंटरियर डिझाईन व प्रगत वैशिष्ट्ये– तसेच या नवीन डस्टरच्या इंटरियरमध्ये देखील काही नवीन गोष्टी ऍड केल्या जातील व काही अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा देखील भर पडेल अशी शक्यता आहे. या नवीन डस्टरची डॅशबोर्डची रचना ही रेनॉल्ट ट्रायबर सारखी असू शकते. तसेच या कारची केबिन बेज आणि गडद रंगात मिळेल अशी शक्यता आहे.
3- इंजिन आणि सेफ्टी फीचर्स– ही नवीन डस्टर 1.0L आणि 1.2 पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली जाऊ शकते. तसेच या गाडीमध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सची सुविधा असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही इंजिन परफॉर्मन्स आणि मायलेजच्या बाबतीत चांगले आहेत.
मात्र हे डस्टर सोबत पुन्हा जोडले जातील असे म्हटले जात आहे. तसेच सेफ्टीच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये EBD, सहा एअर बॅग, हिल होल्ड, हिल असिस्ट आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह तीन पॉईंट सीट बेल्ट यासारखी वैशिष्ट्ये देखील मिळू शकतील.
किती असू शकते या नवीन डस्टरची किंमत?
रेनॉल्ट कंपनीच्या या नवीन डस्टरची किंमत साधारणपणे आठ लाख रुपयापासून सुरू होऊ शकते.